Kamesh Ghadi

21st November 2024
21st November 2024

समाजाच्या चळवळीत ओळख निर्माण करून मरा

समाजाच्या चळवळीत ओळख निर्माण करून मरा

सुरक्षित नोकरी करून सुरक्षित ठिकाणी राहणारे माध्यम वर्गीय लोक स्वताला जास्त शहाणे आणि पैसेवाले समजतात.ज्या गावातून जन्म शिक्षण घेऊन इथ पर्यंत पोचले तो संघर्ष सोयीनुसार विसरतात.त्यांना समाजाशी चळवळीशी काही घेणेदेणे नसते. त्यामुळेच ते मेल्या नंतर त्यांच्या कुटुंब व कार्यालयातील लोकांना जास्तीत जास्त आठ दिवस दुख होते. नंतर सर्वच विसरून जातात.कारण त्यांचा आदर्श नोकरी गाडी, प्लॉट,सुंदर साडीतील बायको एवढाच असतो.म्हणूनच त्यांना सोसायटी व कार्यालया बाहेर कोणी ओळखत नाही.पण ज्यांचा आदर्श तथागत गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,रावबहादुर नारायण मेंघाजी लोखंडे,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव गायकवाड,कर्मवीर भाऊराव पाटील,संत गाडगेबाबा,संत तुकडोजी महाराज.या राष्ट्रसंत महामानव यांचा वैचारिक वारसा असतो. तो सामाजिक बांधिलकी म्हणून अपोआप चळवळीशी जोडल्या जातो .कारण यांनी पैसे कमविण्यासाठी कधीच काम केले नाही.ह्या लोकांनी कधी घरादाराचा, परिवाराचा,नातेवाईकांचा जास्त विचार केला नाही.म्हणूनच ते आज कितीही वर्ष झाले आपल्यातून शरीराने गेले तरी विचारामुळे कामामुळे आजही आपल्या समोर असतात. त्यांना विसरून आपण कोणते ही काम करू शकत नाही.म्हणूनच त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन समाजाच्या चळवळीत स्वताची ओळख प्रत्येक माणसांनी निर्माण करावी.

राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मतःच प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढला असता पण राजसुखाचा त्याग करून राजघराणे का बरं सोडले असावे?. त्यांना स्वतःच्या परिवाराबद्दल प्रेम,आपुलकी नव्हती का?. पण सिद्धार्थ राजघराण्याच्या मोहात असते तर कदाचित इंग्लडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या १० हजार वर्षातील आणि जगातील १०० टॉप महामानवाच्या यादीत प्रथम स्थानावर सिद्धार्थापासून तयार झालेले “गौतम बुद्ध” आम्हाला दिसले नसते. राजसुखाचा लाभ घेतला असता तर जगाला विज्ञानवादी बौद्ध धम्म दिला नसता. २५०० वर्षाचा काळ लोटला तरी आजही संपूर्ण जग त्यांच्या विचारांवर चालत आहे.याला म्हणतात ओळख.त्याग,कष्ट जीद्धीने ती मिळविता येते.

मूठभर मावळे घेऊन महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करणारे हृद्यसम्राट कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या परिवारात गुंतले होते का?. परिवाराच्या अडचणी सोडवत बसले का?. नाही, कारण शिवाजी महाराजांनी स्वतःच्या परिवाराचा विचार न करता आपल्या राज्यासाठी स्वतःला वाहून घेतले. त्यामुळेच जगात महाराजांचे नाव अभिमानाने घेतले जाते. आज करोडो मावळे महाराजांच्या कार्यावर स्तुतीसुमने वाहतांना थकत नाही..”शिवाजी महाराज की” म्हटल्याबरोबर ‘जय’ हा शब्द आपोआपच मुखात येतो कारण महाराजांचे कार्य हे समाजाच्या कल्याणासाठी होते. म्हणूनच आज आमचे ते आदर्श आहेत.संधी साधू राजकीय सैनिकांचे नाही.
स्त्री शिक्षणाची दारे उघडे करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना गोविंदरावाने घराबाहेर काढले. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना वाटत नव्हते का?.की आपल्या घरी कोणत्याही गोष्टीची कमी नाही मग आपण समाजासाठी कशाला वेळ द्यायचा. पण नाही, जर त्यावेळी त्यांनी तसा स्वार्थी विचार केला असता तर आज दीडशे वर्षानंतर ते आमचे आदर्श झाले नसते. “चूल आणि मूल” या कचाट्यातुन महिला बाहेर पडून प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्या अस्तित्वाचा पताका फडकविला नसता. त्यांच्या नावाने चळवळी सुरु झाल्या नसत्या पण आज अभिमानाने त्यांचे नाव घेतले जाते कारण ते घरादाराच्या बंधनापासून अलिप्त होते.
बाबासाहेब विदेशात शिक्षण घेत असतांना त्यांचा मुलगा मरण पावला पण बाबासाहेब घरी आलेच नाही. का?. त्यांना वाटले नसेल का की माझा मुलगा मरण पावला, पत्नी एकटीच घरी आहे. तिला जाऊन आधार द्यावा. पण बाबासाहेबांनी त्या दुःखी प्रसंगी आपल्या परिवाराचा विचार केला नाही तर समाजाचा विचार केला म्हणून आज ते आमच्या हृदयावर आजही अधिराज्य गाजवित आहेत. आणि हो आमच्या माय-बापाने तर फक्त आम्हाला जन्म दिला. पण खरे उपकार बाबासाहेबांच्या त्यागाचे, संघर्षाचे आणि कष्टाचे आमच्यावर आहेत.कारण आमच्या हक्कासाठी स्वतःच्या परिवारातील लोकांचा विचार न करता. त्यांनी समाजातील वर्षानुवर्षे चालत आलेल्या वाईट रूढी,परंपरेला मातीत गाडून आम्हाला स्वातंत्र्याची चव चाखायला दिली.म्हणूनच ते आमचे आदर्श आहेत.दिवसभर गावातील कचरा साफ करून रात्री लोकांच्या डोक्यातील घाण साफ करायचे, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा एकदा कीर्तन करत असतांना त्यांना त्यांच्या मुलाच्या निधनाची वार्ता सांगितली पण मुलाच्या निधनाची वार्ता ऐकताच रडत न बसता गाडगेबाबा म्हणतात, “असे गेले कोट्यान कोटी कशाला रडू मी एकट्यासाठी”. त्यावेळी कीर्तन जाऊदे म्हणून गाडगेबाबा घरी गेले असते तर अशिक्षित असलेल्या गाडगे महाराज यांचे नाव आज अमरावती विद्यापीठाला मिळाले असते काय?.

सुशिक्षित असो की अशिक्षित, संघटीत कामगार कर्मचारी अधिकारी असो की असंघटीत कामगार,मजूर सर्वांना या महापुरुषांचे नाव आणि त्यांचे कार्य आम्हाला का माहित आहेत. कारण ते कधीही स्वतःपुरते आणि घरापुरते विचार न करता समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी त्याग केला,कष्ट घेतले आणि जिद्द ठेवली म्हणूनच अहोरात्र मेहनत घेतली. त्यांच्याच पुण्याईने आम्ही आज सन्मानाचे जीवन जगत आहोत. त्यांच्याच विचाराचा प्रभाव आमच्यावर पडला आहे. म्हणूनच आम्ही खूप पुढे गेलो आहोत.आम्ही त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे पूर्णपणे आचरण केले तर आम्ही जागतिक पातळीवर जोडल्या जाऊ शकतो.

तुम्हाला साधा प्रश्न केला की तुमच्या वडिलांच्या वडिलांचे नांव काय आहे?. तर डोके खाजवायला लागते.सरळ नाही म्हणता येत नाही. तुम्हाला तुमच्या पिढीमधील लोकांचे नाव माहित नाही पण २५०० वर्षांपूर्वी जन्मलेल्या व्यक्तीचे नुसते नावच माहित नाही तर त्यांचे विचार आणि शिकवण आजही तुमच्या डोळ्यासमोर आदर्श निर्माण करून आचरण करायला लावते.कारण हीच तर क्रांतिकारी विचारांची चळवळ आहे.त्यात आपण जोडल्या गेलो तर आपले ही असेच इतिहासात नांव नोंदविल्या जाईल.आपल्याला ज्याची आवड आहे त्या क्षेत्रातील चळवळीत सहभागी व्हा.
विचार करा कर्मचारी अधिकारी म्हणून सेवा निवृत्त झाला तर तुमची कोण किती दिवस आठवण ठेवील?. तुम्हाला वडिलांच्या वडिलांचे आज्याचे नांव,गांव,काम माहित नाही.कारण ते घराच्या बंधनातून कधी बाहेर पडले नाहीत पण आमचे महापुरुष हे स्वतःच्या परिवाराचा विचार न करता समाजाच्या उन्नतीसाठी स्वतःला वाहून घेतले तेच आज आमचे आदर्श आणि प्रेरणास्थान आहेत आणि राहणारच. म्हणून घर सोडून समाजाच्या चळवळीत स्वताची ओळख त्याग,कष्ट आणि जिद्धीने काम करून निर्माण करा.घरात कोणत्या तरी बिमारीने मरण्यापेक्षा समाजाच्या चळवळीत कायम पुढाकार घेऊन.रचनात्मक काम करतांना संघटीत संघर्षाचे साक्षीदार होऊन कायम आठवणीत रहा.

Share this Post (शेअर करा)
Kamesh Ghadi

Kamesh Ghadi

Founder Director @ ReadbookFoundation.com | RTIHumanRightsAssociation.com | RTITimes.com
Social & RTI Activist || Journalist || Social Entrepreneur

Kamesh Ghadi

Kamesh Ghadi

Founder Director @ ReadbookFoundation.com | RTIHumanRightsAssociation.com | RTITimes.com
Social & RTI Activist || Journalist || Social Entrepreneur

More Update Follow Me On  Social Media

Recent Post